धनंजय मुंडेचा टोला - सरकार निर्लज्ज, जनावरांसोबतही सेल्फी मागेल; आता रुमणे घेऊन सज्ज राहा

Foto

बीड – विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही दिवाळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरी करत त्यांच्या व्यथा जाणून घेणार असल्याचे म्हटले आहे. दिवाळीचे पाच दिवस धनंजय मुंडे अंबाजोगाई तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेेणार आहेत. येथील एका गावात झालेल्या कॉर्नर सभेेत त्यांनी फडणवीस सरकार हे निर्लज्ज सरकार आहे. जनावरांना चारा देण्यासाठी जनावरांसोबतचा सेल्फी पाठवा असे म्हणण्यासही कमी करणार नाही, असा टोला लगावला. हे सरकार घालवण्यासाठी आता शेतकऱ्यांनी हातात रुमणे घेऊन सज्ज असले पाहिजेे असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. 


मुंडे म्हणाले, माझ्यासाठी दिवाळीच्या सणापेक्षा शेतकर्‍यांसमोर असलेल्या दुष्काळाचे संकट अधिक महत्वाचे आहे. त्यामुळेच यंदा मी दिवाळी साजरी न करता शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहे.यासाठी धनंजय मुंडे अंबाजोगाईत आले आहेत. तालुक्यातील बर्दापूर गावात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पीकांची स्थिती जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, की हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने तुम्हाला आधार देणार नाही.  त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हातात रुमणे घेऊन सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

 

दिवाळीचे पाच दिवस दुष्काळी भागाचा दौरा

बीड जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशी परिस्थिती शेतकऱ्यांची असताना आम्ही दिवाळी कशी साजरी करु शकतो, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

धनंजय मुंडे दरवर्षी परळी येथील निवासस्थानी दिवाळीचा सण साजरा करतात, मात्र या वर्षी दुष्काळाचे संकट भयावह असल्याने सण साधेपणाने साजरा करत मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.  पाच दिवस ते दुष्काळी भागातील शेतीची पाहणी,  शेतकऱ्यांसोबत चर्चा आणि संवाद साधणार आहेत.  मंगळवारी  त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथून केली.  यावेळी त्यांनी  पाण्याअभावी उद्धवस्त झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर बर्दापूर येथील महादेव मंदिरात परिसरातील 7 गावांतील शेतकरी, दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. मुंडे शेतकऱ्यांना म्हणाले, हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने आपल्याला निसर्गासोबतच सरकारशीही दोन हात करावे लागणार आहेत.  पाच वर्ष केवळ फसवणूकच झाली आहे. आताही तेच सुरू आहे. पाणी टंचाई, वीज टंचाई, चारा टंचाई असताना सरकार तुघलकी निर्णय घेत आहे. जनावरांना चारा देण्यासाठी आता जनावरांसोबत सेल्फी काढून पाठवा असे सांगायलाही हे सरकार कमी करणार नाही, असा टोलाही मुंडे यांनी यावेळी लगावला.

 

शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, वीज बील माफ करा, रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क नव्हे तर संपुर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा या मागण्या त्यांनी केल्या.